जय भवानी रोड येथील राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर हा बिबट्या थेट रस्त्यावर वावरू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. हा बिबट्या फर्नाडिस वाडी येथे राहणाऱ्या सुनील बेहेनवाल यांच्या घरात घुसला होता. तेथून बाहेर पडून या बिबट्याने सुधीर क्षत्रिय नावाच्या एका इसमावर हल्ला केल्याने संबंधित इसम जखमी झाला.
मोठ्या प्रयत्नांनंतरही बिबट्या हाती लागत नव्हता. तसंच बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीला दूर करणे कठीण झाले होते. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. बिबट्याच्या वावरामुळे महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते.
याच परिसरात राहणाऱ्या अॅड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्याच्या आवारातील मारुती सुझुकी गाडीच्या खाली बिबट्या लपला. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी. उपनगर पोलीस व स्थानिक नागरिक यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आणि चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन देत जेरबंद केले.
दरम्यान, या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन अधिकारी पंकज गर्ग, विवेक भदाने, अनिल अहिरराव, देशपांडे, सहायक वन संरक्षक गणेश झोले आणि कर्मचारी हे सहभागी झाले होते.