राहुरी तालुक्यातील गुजांळे गावात ही घटना घडली. तेथे प्रदीप पागिरे हा टेलरिंगचा व्यवसाय करत होता. सोमवारी सकाळी तो एकटाच दुकानात होता. त्याची आई व मित्र अक्षय नवले दुकानाच्या बाहेर बोलत उभे होते. एवढ्यात दुकानातून गोळीबार झाल्याचा आवाज झाला. तो ऐकूण त्यांनी दुकानात धाव घेतली. तेव्हा प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक अंदाजानुसार पागिरे याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचं दिसून येत होतं. मात्र, आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आणि कारणही नसल्याचं कुटुंबियांचे म्हणणं आहे. त्यामुळे पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. मुळात हा गावठी कट्टा कोणाचा आहे, तो पागिरे याच्याकडे कसा आणि कधीपासून आला, त्याने आत्महत्या केली असेल तर कशासाठी केली, शस्त्र हातळत असताना गोळी सुटली असावी का? या प्रश्नांची उकल पोलिसांना करायची आहे.
दरम्यान, या घटनेनंतर राहुरी, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात युवकांना सहज उपलब्ध होणारी शस्त्र हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुन्हेगारी कारवायांसाठी याचा वापर केला जात असल्याचं अनेकदा उघड झालं आहे. काही टोळ्या पकडल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरीही शस्त्र सापडण्याचे आणि त्याद्वारे गुन्हे होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.