गेल्या दोन वर्षात देशात साखरेचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या खपावर परिणाम झाला. यामुळे साखरेचा साठा पडून राहिला. पण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचे दर चांगले असल्याने हा उद्योग तरला. साखरेचे दर घसरले असते तर हा उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत आला असता. पण केवळ चांगल्या दरामुळे शेतकरी आणि कारखानदारही मोठ्या संकटापासून वाचले. यामुळे साखरेच्या उत्पादनाला ब्रेक लावण्यासाठी काही निर्णय घेणे अपेक्षित होते.
यंदा उसाचे क्षेत्र प्रचंड वाढल्याने साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. या हंगामाअखेर देशात ३१४ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. याशिवाय गतहंगामातील साखरेचा साठा शिल्लक आहे. मागणीपेक्षा अधिक साखर उत्पादन झाल्यास दर कमी होवून हा उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात होती. तसे होवू नये म्हणून साखर उत्पादनला ब्रेक लावत त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्याचाच एक भाग म्हणून यंदा देशातील ३४ लाख टन साखर उत्पादन थांबवून त्यातून इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. लवकरच देशात आणखी काही डिस्टलरी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी चार लाख टन साखर निर्मितीला ब्रेक लावण्यात येणार आहे. यामुळे अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाला ब्रेक लागणार असल्याने हा अडचणीत येण्याची शक्यता कमी झाली आहे.
देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. येथील तब्बल ३२ लाख टन साखर उत्पादन थांबवून उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यात आली. यामुळे साखर उत्पादन घटले. उत्तर प्रदेशात यंदा १०२ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे, जे गतवर्षी ११०.५९ लाख टन उत्पादन झाले होते. येथे इथेनॉलच्या उत्पादनासाठी सुमारे १२.५५ लाख टन साखर वळवली जाईल असा अंदाज आहे. महाराष्ट्रात ११.२७ लाख टन तर कर्नाटकात ७.३७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यात येणार आहे.
देशातील इतर ऊस उत्पादक राज्यांमध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. अंदाजानुसार, इतर राज्ये उदा. तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, बिहार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, ओडिसा आणि उत्तराखंड या राज्यांनी एकत्रितपणे सुमारे ५०.६० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. या राज्यांचा एकत्रितपणे अंदाजे २.८१ लाख टन साखर समतुल्य इथेनॉल उत्पादनात वळवल्याचा अंदाज आहे.
‘बाजारात मोठ्या प्रमाणात साखर आली असती तर त्याचे दर पडण्याची भीती होती. त्यामुळे हा उद्योग आर्थिक संकटात सापडला असता. पण साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती केल्याने मोठे संकट दूर होणार आहे,’ असं साखर उद्योगाचे अभ्यासक विजय औताडे यांनी म्हटलं आहे.