विदर्भात रिफायनरी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा मुद्दा वर्षभरापूर्वी नव्याने ऐरणीवर आला. तत्कालीन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यवहार्यता अहवालाचे आश्वासन दिले. यानंतर कुठलीच हालचाल झाली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार आशिष देशमुख अशा दिग्गज नेत्यांनी ‘वेद’च्या मागणीचा पाठपुरावा केला, हे विशेष. कुहीजवळील नॅशनल इन्व्हेस्टमेंट व मॅन्युफॅक्चरिंग झोन थंडबस्त्यात आहे. नायपरची घोषणा झाली, पण त्यावर अद्याप काहीच झालेले नाही. विदर्भात रेल्वेचे अनेक प्रकल्प गतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना बळ द्यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये नागपूर-विदर्भात आले. केंद्रीय रस्ते निधीतून विविध रुंदीकरण, उड्डाणपूल आणि महामार्गाचे काम सुरू आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात निधीची आस लागली आहे. मात्र, इतर प्रकल्पांना अपेक्षित निधी मिळालेला नाही. शेतकऱ्यांना हमी भावाची आस लागली आहे. विजेच्या खासगीकरणाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. पंतप्रधान सिंचन योजनेत गोसेखुर्दसह सात प्रकल्पांचा समावेश आहे. बळीराजा योजनेतही अनेक प्रकल्प आहेत. गोसेखुर्दची किंमत सातत्याने वाढत असून नवीन मुहूर्तानुसार २०२४ सालापर्यंत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुबलक निधी द्यावा, अशी भूमिका संबंधित यंत्रणांनी व्यक्त केली.
मिहानमध्ये डिफेन्स पार्क सुरू झाला. विदर्भात डिफेन्स हब तयार करण्याचे सुतोवाच केले होते. मिहानमधील कार्गो हब आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा मंदावली आहे. मिहान व मेट्रोला गती देण्यासाठी केंद्राकडून कोणते प्रयत्न होतात, याची उत्सुकता नागपूरकरांना आहे.