देशातील ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या आजघडीला १४ कोटींच्या जवळपास आहे. देशातील बँकांमधील मुदत ठेवींवरील घटते व्याजदर या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक सरकारकडून या अर्थसंकल्पात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा करत आहेत. अर्थसंकल्पात यासंबंधी काय घोषणा केली जातेय याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन प्रमुख बचत योजना राबवत आहे. प्रधानमंत्री वय वंदना योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच एससीएसएस या योजना आहेत. प्रधानमंत्री वय वंदना योजनेत ६० वर्षांहून अधिक वयोगटातील सर्व नागरिक १५ लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक ३१ मार्च २०२३ च्या पूर्वी करू शकतात. गुंतवणुकीच्या आधारे नागरिकांना १ हजारांपासून ९२५० रुपये प्रति महिना पेन्शन मिळते. तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणुकीसाठी १५ लाखांपर्यंतची मर्यादा आहे. ज्येष्ठ नागरिकांना ६० वर्षांनंतर नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. त्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ७.४ टक्के व्याज मिळते आणि प्राप्तिकर कायद्याच्या सेक्शन ८० सी नुसार करात सूटही मिळते.