नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला. त्यानुसार १९ किलोच्या वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ९१.५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत आता १९ किलो सिलिंडरचा भाव १८५७ रुपये इतका झाला आहे. याआधी जानेवारी महिन्यात सिलिंडर १०२ रुपयांनी स्वस्त झाला होता. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत.

आजच्या दर कपातीनंतर मुंबईत १९ किलो सिलिंडरचा भाव १८५७ रुपये इतका झाला आहे. गेल्या महिन्यात तो १९४८.५० रुपये इतका होता. दिल्लीत तो १९०७ रुपये इतका झाला आहे. चेन्नईमध्ये १९ किलोच्या गॅससाठी २०३९.५ रुपये आणि कोलकात्यात १९८४.५ रुपये दर असेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटलं आहे.

यापूर्वी सलग दोन महिने १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यात वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत तब्बल २६६ रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर १ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या आढाव्यात हा सिलिंडर आणखी १०० रुपयांनी सिलिंडर महागला होता.

दरम्यान, सलग चौथ्या महिन्यात घरगुती वापराच्या सिलिंडरचा भाव स्थिर ठेवण्यात आला आहे. आज १ फेब्रुवारी २०२२ रोजी घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती सिलिंडरच्या किमती डिसेंबर २०२१ नुसार स्थिर आहेत. मुंबई आणि दिल्लीत १४.२ किलो सिलिंडरचा दर ९०० रुपये आहे. कोलकात्यात ९२६ रुपये आणि चेन्नईत ९१६ रुपये दर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here