निमखेडी परिसरातील रोहन गजानन पाटील (वय १९) हा तरुण टेलिग्राम हे अॅप वापरत होता. त्यावर त्याला पार्ट टाईम जॉबच्या संदर्भात एक जाहिरात दिसली. या जाहिरातील प्रतिसाद दिल्यानंतर ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्याला एका अनोळखी मोबाइल नंबरवरुन सुरेंद्र नावाच्या व्यक्तीचा कॉल आला. सुरेंद्र याने रोहनला पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवले. जॉबची ऑर्डस पास करून देतो असं सांगून ऑनलाईन पद्धतीने पैसे भरण्यास सांगितलं. त्यानुसार रोहनने फोन-पे च्या माध्यमातून एकूण १ लाख ४८ हजार ५७३ रूपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. नंतर संबधित मोबाईल नंबर बंद झाल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर रोहनने तालुका पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.
वीजबिलाची चौकशी महागात
जळगावातील तेजस निवृत्ती कासार (वय २८, रा. भवानीपेठ) याने २८ जानेवारी रोजी वीजबिल भरण्यासाठी फोन-पे ने त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन ५ हजार रूपये पेमेंट केले. मात्र, वीजबिल भरले गेले नाही. यामुळे त्याने क्रेडिट कार्डच्या संबधित कस्टमर केअरला फोन लावला. पैशांबाबत त्यांनी विचारणा केली आणि थोड्यावेळाने त्यांना एका अनोळखी नंबरवरून कॉल आला.
पैसे परत मिळवण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमधून ‘एनीडेस्क रिमोट डेक्सटॉप अॅप्लिकेशन’ डाऊनलोड करायला लागेल, असं सांगण्यात आले. समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे क्रेडिट कार्ड स्कॅन करून तेजस कासार यांनी सर्व माहिती भरली. नंतर पुन्हा दुपारी २.३० वाजता अशाच प्रकारे दुसऱ्या बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती भामट्याने विचारली. ही माहिती देखील कासार यांनी दिली. परंतु, या सर्व प्रक्रियेवर संशय बळावल्यामुळे कासार यांनी लगेच ईमेल तपासले. यावेळी त्यांच्या दोन्ही बँकच्या खात्यातून ८४ हजार ८८९ रूपये परस्पर वळते केल्याचे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कासार यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.