नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला क्रिकेटचा सामना म्हणजे तिसरं युद्धचं. आता हे युद्ध लवकरच पाहण्याचा योग क्रिकेट चाहत्यांना लाभणार आहे. कारण आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात थरार रंगणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना कुठे आणि कधी होणार, पाहा…तब्बल २४ वर्षांनी आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा सहभाग होणार आहे. ही स्पर्धा २८ जुलै ते आठ ऑगस्ट या कालावधीमध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे खेळवण्यात येणार आहे. या क्रीडा स्पर्धेत महिलांचे आठ संघ सहभागी होणार आहे. भारताच्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बार्बाडोस संघाचा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचा समावेश करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना २९ जुलैला खेळवण्यात येणार आहे, तर सुवर्ण आणि कांस्य पदकाचे सामने ७ ऑगस्टला खेळवण्यात येणार आहेत. यापूर्वी १९९८ साली मलेशियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्टीव वॉ याच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया आणि शॉन पोलॉकच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेचे संघ पोहोचले होते. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर मात करत जेतेपद पटकावले होते. पण त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला नव्हता. पण आता तब्बल २४ वर्षांनी क्रिकेटचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुनरागमन झाले आहे. त्यामुळे महिला क्रिकेटला एक चांगली संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळाली आहे.

यावेळी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ एलार्डिस यांनी सांगितले की, ” महिला क्रिकेटसाठी हे एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. आमच्याकडे सुवर्णपदक पटकावण्यासाठी इच्छुक असलेले आठ दमदार संघ आहे. या आठ संघांमध्ये चांगले क्रिकेट खेळले जाईल आणि स्पर्धा चांगली होईल, असा आम्हाला विश्वास आहे. महिला क्रिकेटला प्रसिद्धी मिळण्यासाठी ही एक चांगली स्पर्धा आहे, त्यामुळे या स्पर्धेत कोणता संघ कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here