पुणे-नाशिक मार्गाचे काय?
पुणे-नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात नेमकी किती तरतूद झाली, हे मंगळवारी रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही. पुणे-लोणावळा दरम्यानच्या तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे पुढे काय झाले, याचा उल्लेखही गेल्या एक-दोन वर्षांच्या अर्थसंकल्पात झालेला नाही. त्यामुळे हा प्रकल्प बहुतेक गुंडाळल्यातच जमा आहे.
देशात तीन वर्षांच्या कालावधीत चारशे नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. वंदे भारत या स्वदेशी विकसित सेमीहाय स्पीड ट्रेन आहेत. या गाड्या पुणे, मुंबई, नाशिक या मार्गांवर चालू कराव्यात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग, शेती, पायाभूत सुविधांसह विकास चालना मिळेल असं रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पात रेल्वेसाठी आर्थिक तरदूत ही झोननुसार करण्यात येते. मध्य रेल्वेच्या वाट्याला येणाऱ्या निधीपैकी निम्म्यापेक्षा जास्त निधी मुंबई विभागात खर्च होतो. उर्वरित महाराष्ट्रासाठी खूपच तोकडा निधी मिळतो. आम्ही सातत्याने गेली दोन वर्ष विभागनिहाय स्वतंत्र निधी देण्याची मागणी केली जात आहे. असे झाले, तरच मुंबई वगळता महाराष्ट्रातील रेल्वेचे प्रकल्प पूर्ण होतील अशी माहिती दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघांचे सचिव विकास देशपांडे यांनी दिली.