भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली. नदीनाका येथे कारमधून जिलेटिनच्या कांड्या आणि डीटोनेटरची वाहतूक केली जात होती. जवळपास १ हजार जिलेटिनच्या कांड्या आणि तितक्याच संख्येने डीटोनेटर वाहून नेले जात होते. पोलिसांच्या पथकाने कार अडवून झडती घेतली असता, हा स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड फेकून सोन्याच्या पाच चेन आणि दोन ब्रेसलेट केले चोरी
पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी गस्त घालून नदीनाका येथे दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक कार अडवली. या कारमधील खोक्यांमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि डीटोनेटर होते. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अल्पेश उर्फ बाल्या पाटील (वय ३४, आपटी खुर्द, विक्रमगड), पंकज चौहान (विक्रमगड) आणि समीर उर्फ सम्या वेडगा (वेडगेपाडा, विक्रमगड) अशी या तिघा आरोपींची नावे आहेत.
प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या तिघांनी हा स्फोटकांचा साठा चोरी केलेला असण्याची शक्यता असून, तो विकणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील चौकशी सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.