न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत. परंतु, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मिळालेले नाही.
न्यायालयात जाण्यापूर्वी नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. आतापर्यंत राज्य सरकारने मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचे अनेक प्रयत्न केले. पण आज मी स्वत:हून न्यायालयासमोर हजर होत आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले. नितेश राणे सध्या कणकवली पोलीस ठाण्यात गेले आहेत. आता पोलीस त्यांना अटक करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
उच्च न्यायालयातही नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळाला जाण्याची दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून नितेश राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर सकाळपासून वकिलांची खलबंत सुरु होती. या बैठकीत नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि कायदेतज्ज्ञ उमेश सावंत हजर होते. तर सतीश मानशिंदे आणि इतर वकील मुंबईतून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीअंती नितेश राणे यांनी न्यायालयासमोर शरणागती पत्कारावी, असा निष्कर्ष निघाला. जेणेकरुन त्यांना जामीन मिळण्याची वाट सुकर होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. त्यानुसार नितेश राणे यांनी कोर्टासमोर आत्मसमर्पण केले.