खडकी येथे औंध रस्त्यावरील बाबुराव घोलप महाविद्यालयासमोरील बस थांब्यावर ३१ जानेवारी रोजी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी तरुण हा पिंपळे गुरव येथे राहण्यास आहे. तर, तक्रारदार तरुणी औंध रस्ता परिसरात राहायला आहे. तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एका खासगी ठिकाणी नोकरी देखील करते.
आरोपी तरुण गेल्या पाच महिन्यांपासून तरुणीच्या मागावर आहे. त्याने तरुणीचे कॉलेज, कामाचे ठिकाण येथे जाऊन तरुणीकडे तिचा मोबाइल क्रमांक मागितला होता. मात्र, तरुणी त्यास सातत्याने टाळत होती. ३१ जानेवारीला तरुणीने मोबाइल क्रमांक देण्यास नकार दिला. त्याचा आरोपीला राग आला. त्याने तरुणीला अंगावर ॲसिड टाकून मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.