पिंपरी चिंचवड पोलिसांकडे या सर्व प्रकाराबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजप कामगार आघाडी, महाराष्ट्र प्रदेश ही संस्था २०१९ पासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत दरवर्षी १२०० रुपयांची पावती करून व्यापाऱ्यांची आर्थिक फसवणूक केली असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. गुड्डू यादव, घनश्याम यादव, मलका यादव, केशव घोळवे आणि हसरत अली शेख या सर्वांवर गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसात एका ४५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या मेट्रो प्रकल्प सुरू आहे आणि या प्रकल्पात नेपाळी मार्केट येथील जागा जाणार असल्याने तेथील व्यापाऱ्यांना शासनामार्फत १०० गाळे मिळणार होते. तरीसुद्धा २०१९ पासून तक्रारदार आणि इतर व्यापाऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीने गाळे मिळवून दिले जातील, असं भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं होतं आणि या बदल्यात संस्थेत दरवर्षी १२०० रुपयांची पावती करायला लावली होती, अशी तक्रार तक्रारदारांनी केली आहे.
गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने ५५ हजार रुपयांची खंडणी घेऊन सुद्धा आरोपींनी आणखी एक लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु ही खंडणी देण्यास विरोध केला म्हणून जीवे मारून टाकू अशी धमकी आरोपींनी तक्रारदारांना होती असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली असतानाच घडलेल्या या घटनेनं शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.