जळगाव : बंद पडलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी तपासण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाचा गिअरमध्ये असलेला ट्रॅक्टर अचानक सुरू झाल्याने त्याखाली चिरडून मृत्यू झाला. ही दुर्घटना जळगाव शहराजवळील असोदा रेल्वे गेटवर बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. विठ्ठल यशवंत रायसिंग (वय ४५, रा. वाल्मिक नगर असोदा) असं मृत चालकाचं नाव आहे.

जळगाव तालुक्यातील असोदा येथील रहिवासी विठ्ठल रायसिंग हे ट्रॅक्टर चालक आहेत. बुधवारी सकाळी ट्रॅक्टर (एमएच १९ बीजी ६०७७) घेवून ते जळगावात दुरुस्तीसाठी आले होते. ट्रॅक्टरची दुरुस्ती केल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते ट्रॅक्टरवर असोदा येथे जात होते. याचवेळी असोदा रेल्वे गेट बंद असल्याने रस्त्यावर उभे होते. रेल्वेगेट उघडल्यानतंर ट्रॅक्टर अचानक बंद पडला. यावेळी चालकाने वायरच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या बॅटरीला करंट देऊन तो सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र गिअरमध्ये असलेला ट्रॅक्टर अचानक सुरू झाला आणि ट्रॅक्टरच्या समोर उभा असलेले चालक विठ्ठल रायसिंग हे पुढील चाकाखाली चिरडले गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान नागरिकांनी त्यांना तात्काळ रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी, सून असा परिवार आहे.

omicron latest update: राज्यात आज ओमिक्रॉनचे ११३ नवे रुग्ण, सर्वाधिक नागपुरात

दुचाकीला धडकून ट्रॅक्टर कोसळला नाल्यात

रेल्वे गेट बंद असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. याचवेळी समोरू अर्जुन संतोष तायडे (वय ३५) व त्याचा मित्र निलेश श्रीरंग घाडगे हे दुचाकीवर (एमएच १९ डीआर ४७९२) यावल तालुक्यातील हिंगोणे येथे लग्नाला जात होते. रेल्वे गेट बंद असल्याने ते उभे होते. त्यांच्या मागच्या बाजूस गिअरमध्ये उभा असलेला ट्रॅक्टर अचानक सुरू झाल्याने समोर असलेल्या दुचाकीला धडक देत त थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जाऊन कोसळला.

ट्रॅक्टरच्या समोर असलेले अर्जुन तायडे व निलेश घाडगे हे दुचाकीस्वार गेट उघडण्याची वाट पाहत होते. त्या दोघांनी दुचाकीवरुन उडी मारल्याने ते बालंबाल बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेत दोघा तरुणांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात ट्रॅक्टचालकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here