मिळालेल्या माहितीनुसार, मनीष ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून प्रवाशांना घेऊन गोव्याकडे जात होती. या बसमधून ३७ प्रवासी प्रवास करत होते. आज, गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास या बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे गोंधळ उडाला. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सर्व ३७ प्रवासी बालंबाल बचावले. एक वृद्ध महिला जखमी झाली आहे.
या खासगी बसमध्ये ३७ प्रवासी होते. ही बस पुण्याहून गोव्याला जात होती. पहाटेच्या सुमारास करूळ घाट उतरल्यानंतर एडगावजवळ बस आली असता, तिने अचानक पेट घेतला. काही कळायच्या आत आग पसरली. चालकाने प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बाहेर पडण्यास सांगितले. तर एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, महामार्ग विभागाचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच कुडाळ येथील अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या आगीच्या घटनेमुळे एडगाव परिसरात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी सात वाजल्यापासून अडकलेली सर्व वाहने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.