इस्लामाबाद, पाकिस्तान :
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील पंजगूर आणि नुष्की भागात फ्रंटियर कॉर्प्स आणि लष्कराच्या तळावर भीषण हल्ला झाल्याचं समोर येतंय. पाकिस्तानी लष्करासाठी काळ ठरलेल्या बलूच बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. या हल्ल्यात १०० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा दावा बलूच बंडखोरांनी केला आहे.
तर दुसरीकडे, बलुचांचा हा हल्ला उधळून लावल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केलाय. या हल्ल्यात चार दहशतवाद्यांना ठार केल्याचंही पाकिस्तानी लष्करानं म्हटलंय. पाकिस्तानी लष्कराकडून आपला केवळ एक जवान शहीद झाल्याची पुष्टी करण्यात आलीय.
याअगोदरही, बलूच बंडखोरांनी १० पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं होतं. या घटनेची पुष्टी तब्बल ३० तासानंतर जनरल बाजवा यांनी केली होती.
पंजगूर आणि नुष्की या दोन्ही ठिकाणी बलुच बंडखोरांचा हल्ला हाणून पाडण्यात आल्याचं पाकिस्तानी लष्करानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलंय.
या हल्ल्यात बंडखोरांचं मोठं नुकसान झाल्याचा दावाही पाकिस्तानी लष्करानं केलाय. दहशतवाद्यांनी पंजगूर भागातील सुरक्षा दलाच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेळीच प्रत्यूत्तर देत हा हल्ला उधळून लावल्याचा आला, असं पाकिस्तानी लष्करानं म्हटलंय.
‘पाकिस्तानी लष्कराचा तळ उद्ध्वस्त’
पाकिस्तानी लष्करानं आपल्या निवेदनात, क्रॉस फायरिंगमध्ये एक जवान शहीद झाल्याचं मान्य केलंय. या भागात दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. ‘फ्रंटियर कॉर्प्स’नं दिलेल्या कबुलीनुसार, त्यांच्या छावणीजवळ दोन स्फोट झाले आणि त्यानंतर सुरू झालेला गोळीबार अजूनही सुरू आहे.
‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’कडून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. या हल्ल्यात १०० पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा ‘बीएलए’नं केलाय. या भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा तळ जवळजवळ उद्ध्वस्त झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘बीएलए’नं केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तानी लष्कराकडून प्रसार माध्यमांना या हल्ल्याबाबतचं वृत्त प्रसारित करण्यापासून रोखण्यात आलं. संबंधित भागातील इंटरनेट आणि फोन बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्करानं हल्ला हाणून पाडल्याचा केलेला दावाही खोटा असल्याचं बलूच बंडखोरांनी म्हटलंय.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा हल्ला उधळून लावल्याबद्दल पाकिस्तानी सुरक्षा दलांचे कौतुक केलंय. संपूर्ण देश पाकिस्तान लष्कराच्या पाठिशी उभा असल्याचंही इम्रान खान यांनी म्हटलंय.