सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आता या प्रकरणात कणकवली पोलिसांकडून आणखी एक अनपेक्षित निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पोलीस पुढील तपासासाठी नितेश राणे (Nitesh Rane) यांना पुण्यात नेऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. संतोष परब यांच्यावरहील हल्ल्याचा कट हा पुण्यात शिजल्याची माहिती आहे. त्यामुळे नितेश राणे यांना तपासासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी नेण्यात येऊ शकते. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नितेश राणे यांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांची रवानगी सावंतवाडी येथील कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले. याठिकाणी राकेश परब आणि नितेश राणे यांची समोरासमोर बसवून चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, आता पोलिसांनी नितेश राणे यांना पुण्यात नेल्यास याप्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
Nitesh Rane: अटक होऊनही नितेश राणे निवांत, तुरुंगात कामी आला वाचनाचा व्यासंग?
या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्गातील भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप नेत्यांनी गुरुवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेत्यांनी पोलिसांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. नितेश राणे यांच्यावर राजकीय हेतूने कारवाई केली जात आहे. पोलीस दबावाखाली आहेत. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाबाहेर ज्याप्रकारे नितेश राणे यांची गाडी अडवण्यात आली आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तो प्रकार चुकीचा आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक वरुन येणाऱ्या आदेशांप्रमाणे कारवाई करत आहेत. या माध्यमातून हेतूपूर्वक वातावरण बिघडवले जात आहे. अशाने लोकांमध्ये असंतोषाचा भडका उडायला वेळ लागणार नाही. आम्ही पोलिसांविरुद्ध रस्त्यावर उतरु. सरकार येईल आणि जाईल, पण कायदा सर्वांसाठी समान असतो, हे लक्षात ठेवावे, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटले.

‘नितेश राणे सुपारीबाज आमदार’

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेत असलेले भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे ‘सुपारीबाज’ आमदार असल्याचा खळबळजनक आरोप सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे. ते कणकवली येथे बोलत होते. नितेश राणे यांनी सातपुते याला सुपारी देऊनच शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळेच त्यांना पोलीस कोठडीत जावे लागले, असेही ते म्हणाले. नितेश राणे यांच्या ‘समय बलवान है’ या ट्वीटवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राणे यांचे बरोबर आहे. समय बलवान होता म्हणून योग्य वेळी योग्य वेळेने साथ दिली. म्हणून तुम्हाला पोलीस कोठडीत जावे लागले. यामुळे समय बलवान आहे हे त्यांचे वाक्य तंतोतंत बरोबर आहे, असा टोला सावंत यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here