ईडी, सीबीआय आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. निवडणुकांच्या आधी शरद पवार यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. आता उत्तर प्रदेशातही हेच उद्योग सुरू आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.
महाराष्ट्रात आघाडी सरकार झुकत नाही हे लक्षात येताच, अनिल देशमुख असतील किंवा आता संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई करून अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे डाव भाजप खेळत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. देशात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून पाच राज्यांतील निवडणुकीतून हे सगळे समोर येणारच आणि या यंत्रणांचा वापर जास्त दिवस चालणार नाही, अशी खात्रीही नवाब मलिक यांनी व्यक्त केली.
अँटिलिया स्फोटक प्रकरणामागे परमबीर सिंह: मलिक
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर जी स्फोटके ठेवण्यात आली होती, त्या प्रकरणामागे परमबीर सिंह हेच मुख्य सूत्रधार आहेत. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला. सचिन वाझे हा परमबीर सिंह यांच्याच टोळीचा भाग आहे. परमबीर सिंह ठाण्यात पोलीस आयुक्त असतानाही त्यांचे भाजपच्या नेत्यांना हाताशी धरून अनेक उद्योग सुरू होते, असंही मलिक म्हणाले. अँटिलिया प्रकरणानंतर बदली झाल्यानंतर परमबीर सिंह यांनी खोटे आरोप करून अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम केले, असे नवाब मलिक म्हणाले.