सांगली : मालकाची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार आज सांगलीतील नोंदणी कार्यालयात उघडकीस आला. परस्पर जमीन विक्रीचा प्रकार लक्षात येताच संबंधित जमीन मालकाच्या नातेवाईकांनी जमीन विक्री करणाऱ्या टोळीला बेदम चोप देत सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. (Sangali Crime)

मिरज तालुक्यातील कवलापूर गावच्या हद्दीत तासगाव रोडवर गॅस गोडाऊनजवळ निवृत्ती सीताराम हारुगडे (वय ५६) यांच्या मालकीची दोन एकर जमीन आहे. ही जमीन अनेक वर्षांपासून मोकळी आहे. इचलकरंजी येथील एका एजंटची नजर या मोक्याच्या जागेवर पडली. त्याने या जमिनीचा सातबारा उतारा काढला. एक ग्राहक शोधून मूळ मालकाच्या जागी एक बोगस व्यक्ती उभा केली. हारुगडे यांच्या नावाने बोगस रेशन कार्ड आणि आधारकार्ड तयार केले.

लोकांनी पाण्यासाठी सोडले गाव; गेल्या २८ दिवसांपासून ग्रामस्थ पाण्याविना

सदरच्या जमिनीचे खरेदीपत्र करण्यासाठी आज दुपारी पाच जण सांगलीतील जुन्या राजवाडा चौकात असलेल्या नोंदणी कार्यालयात पोहचले होते. याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला हरुगुडे यांच्या कागदपत्रांबद्दल संशय आला. त्याने थेट हारुगडे यांचा पुतण्या मारुती हारुगडे यांना फोन करून, तुमच्या चुलत्यांच्या जमिनीची विक्री सुरू असल्याचे सांगितले. बोगसगिरीचा प्रकार लक्षात येताच मारुती हरुगुडे हे काही मित्रांसह सांगलीतील नोंदणी कार्यालयात पोहचले.

याचवेळी निवृत्ती हरुगडे यांच्या जमिनीची परस्पर विक्री करणारे पाच जण आढळले. मारुती हरुगडे यांनी जमीन विक्री करणाऱ्या टोळीतले निवृत्ती हरुगडे यांच्याबद्दल विचारणा केली. त्यावर दोघांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस येताच मारूती हरुगुडे आणि त्याच्या मित्रांनी संबंधित टोळीतील तिघांना पकडून बेदम चोप दिला. यावेळी टोळीतील दोघे पळून गेले.

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला मारुती हरुगडे यांनी बेदम चोप देत, सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत अक्षय पाटील यांनी फिर्याद दिली. बोगस कागदपत्र तयार करून, बनावट व्यक्ती उभ्या करून कोट्यवधी रुपयांची जमीन हडपणाऱ्या टोळीने अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here