शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हेरीटेज आणि लीना पार्क सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आपल्या मुलभूत हक्कांवरच गदा येत असल्याचे म्हणत सोसायटीतच राहणाऱ्या अॅड. सत्यजित कराळे पाटील या वकिलाने थेट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
दुचाकीचे सीट फाडणे, चारचाकी वाहनांवर चढून नुकसान करणे, सोसायटीत येणाऱ्या नागरिकांवर धावून जाणे, पार्किंगमध्ये खेळण्यासाठी जाणाऱ्या लहान मुलांवर हल्ला करणे, बाहेरील कचऱ्यातून खाद्यपदार्थ सोसायटीत आणणे असे उपद्रव या भटक्या कुत्र्यांकडून सुरू आहेत. याबाबत वारंवार अहमदनगर महापालिकेला लेखी तोंडी तक्रारी करूनही याकडे महानगरपालिकेचे प्रशासन लक्ष देत नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
अहमदनगर महापालिकेच्या प्रभारी सॅनेटरी अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, महापालिकेचे पिंपळगाव माळवी येथे शेल्टर होम असून कायदेशीर पद्धतीने कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना सोडून दिलं जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात सत्यजित कराळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय याबाबत नेमका काय निर्णय देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.