अग्निशमन दलाला याची वर्दी मिळताच दलाची टीम दुर्घटनास्थळी दाखल झाली. तसंच, येरवडा पोलीस देखील तेथे पोहोचले होते. लोखंडी गजांखाली अडकलेल्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना अडचणींचा सामना करावा लागला. जवानांनी कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला केला. एका मागोमाग एक त्यांनी सात जणांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वाहतूक शाखेचे उपायुक्त राहुल श्रीरामे, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव आदी यावेळी घटनास्थळी उपस्थित होते.
गुन्हा दाखल करणार
या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा साधने नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, असं येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युनूस शेख यांनी सांगितलं आहे.