पुणे : कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी अखेर आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. माझ्या वक्तव्याने भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो, असं बंडातात्या यांनी म्हटलं आहे. सायंकाळी इंदापूर तालुक्यातील कार्यक्रमानंतर माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हा माफीनामा सादर केला. (Bandatatya Karadkar)

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारू पितात, असं वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी साताऱ्यातील आंदोलनाच्या दरम्यान केलं होतं. कराडकर यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात वादंग निर्माण झालं आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली. त्यामुळे अखेर बंडातात्या यांनी नमतं घेत वक्तव्याबाबत माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

बंडातात्या कराडकर यांचं वादग्रस्त विधान; राजकीय नेत्यांबद्दल म्हणाले…

‘ज्यांच्याविषयी मी बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क केला आहे. त्यामुळे जर माझे वक्तव्य चुकले असेल तर मी माफी मागतो. माफी मागण्यात कमीपणा कसला? पत्रकारांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केलं. पत्रकारांनी आता विषय वाढवू नये,’ असंही ते म्हणाले.

रुपाली चाकणकर यांनी दिल्या होत्या कारवाईच्या सूचना

‘सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल ४८ तासाच्या आत आयोगास सादर करावा. तसंच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा,’ अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या होत्या. त्यामुळे कराडकर यांच्या अडचणी वाढणार, हे स्पष्टच झालं होतं. आता बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितल्याने या वादावर पडदा पडणार का, हे पाहावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here