मुंबई: धारावीत आज आढळलेल्या करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या वक्तीचे वय ५६ वर्षे इतके होते. सायन रुग्णालयात या रुग्णाला हलवण्यात आले होते. तिथेच त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील दिवसभरातील करोनाचा हा तिसरा बळी ठरला आहे.
धारावीतील एसआरए बिल्डिंगमधील एका व्यक्तीला करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. या व्यक्तीला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले होते. या व्यक्तीच्या घरातील अन्य ७ जणांना होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले होते. या सर्वांची करोना चाचणी उद्या घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याचवेळी संबंधित बिल्डिंगही सील करण्यात आली होती.
दरम्यान, करोनाबाधीत रुग्णाचा सायन रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने धारावी परिसरात नागरिक चिंतेत पडले आहेत. या व्यक्तीला ताप येत होता. त्याला कफही होता तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचे मूत्रपिंडही निकामी झाले व या साऱ्यातून त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times