शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे हे अडचणीत आले आहेत. आधी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांना कोर्टात शरण येण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वीच नितेश राणे हे सिंधुदुर्ग न्यायालयात हजर राहून त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयानेही त्यांना जामीन दिला नाही. त्यानंतर राणे अखेर न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज, शुक्रवारी राणे यांच्या पोलीस कोठडीची मदत संपत आहे. त्यामुळे त्यांना दुपारपर्यंत न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात येणार आहे.
मागील दोन दिवस आमदार नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. आमदार राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची एकत्रित चौकशी करण्यात आली. त्यानंतर नितेश राणे यांची कणकवली पोलिसांनी साडेपाच तास चौकशी केल्यानंतर गोवा येथील नीलम बिट्स या हॉटेलमध्ये त्यांना नेले. तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली. याच हॉटेलमध्ये संतोष परब यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती मिळाल्याचे समोर आले होते. त्यानुसार, पोलिसांनी यासंदर्भात चौकशी केली. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे, असे सांगितले जाते. दरम्यान, त्यांना कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस कोठडी दिली जाते की न्यायालयीन कोठडी? आणि त्यानंतर ते जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतात का? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.