नागपूर बातम्या मराठी: बापरे! खोकला जाईना म्हणून महिला डॉक्टरांकडे गेली, फुप्फुसात असं काही दिसलं की डॉक्टरही चक्रावले – clove stuck in the lungs for seven years successful surgery of a woman from indore in nagpur
नागपूर : सतत खोकला येत असल्याने कर्करोग झाल्याची शंका होती. मात्र, महिलेच्या फुप्फुसातून चक्क लवंग बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून ही लवंग तिच्या फुप्फुसात अडकून होती. या अनुषा नामक ३६ वर्षीय महिलेला दोन-तीन वर्षांपासून खोकल्याचा त्रास होता. त्याचसह दम लागणे, छातीत दुखणे व अधूनमधून थुंकीत रक्त येणे, अशी लक्षणेही होती. वजनही कमी होत होते. त्यामुळे त्यांना इंदूर येथील डॉक्टरांना दाखविले असता त्यांनी कर्करोगाची शक्यता व्यक्त केली.
हे कळताच घरातील परिस्थिती बदलून गेली होती. पतीच्या कामावर आणि शाळेत जाणाऱ्या मुलावरही त्याचा परिणाम झाला होता. त्यानंतर या महिलेला नागपुरात ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्याकडे आणण्यात आले. त्यावेळी त्यांनी केलेल्या तपासण्यांमध्ये या तरुणीला कर्करोग नाही तर तिच्या फुप्फुसात काहीतरी अडकले असल्याचे निदान झाले. अत्याधुनिक यंत्रांद्वारे केलेल्या पाहणीत ती लवंग असल्याचे सिद्ध झाले. त्या तरुणीलाही सात वर्षांपूर्वी गळ्यात लवंग अडकल्याचा प्रसंग आठवला. ब्रोन्कोस्कोपिक क्रायो बायप्सी, डायलेटेशन (फुगा) आणि फॉरेन बॉडी रिमूव्हल अशा प्रक्रिया करून ही लवंग बाहेर काढण्यात आली. या प्रक्रियेसाठी कुठलीही चिरफाड करावी लागली नाही. तोंडाद्वारे फुप्फुसांमध्ये दुर्बिण (ब्रॉन्कोस्कोप) घालून पूर्ण प्रक्रिया करण्यात आली. एकूणच यामुळे कर्करोगाची शक्यता व्यक्त केल्यानंतर जेव्हा लवंग निघाली तेव्हा अनुषा यांच्या परिवाराने सुटकेचा निश्वास टाकला. आगामी काळात भाजपचे दिग्गज नेते शिवसेनेत येणार; सत्तारांच्या विधानाने खळबळ डाव्या फुप्फुसाच्या खालील भागापर्यंत पोहचणे फार कठीण असते. निदान झाले नसते तर किंबहुना फुप्फुसाचा हा भाग कापावा लागला असता. मात्र, डॉ. अरबट यांच्या मार्गदर्शनात श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील बाकमवार, डॉ. परिमल देशपांडे, सुंगणीतज्ज्ञ डॉ. आशुतोष जयस्वाल यांनी ही यशस्वी प्रक्रिया केली.
वयाच्या ३६ व्या वर्षी कर्करोगाची शक्यता व्यक्त करण्यात येते आणि नंतर ते लवंगीवर निभावून नेल्या जाते, हे रुग्णासाठी सुखावणारे आहे. रुग्ण व त्यांच्या परिवाराची भीती एका क्षणात नष्ट झाली. फुप्फुसाचा तो भाग क्लीअर झाला असून आता रुग्ण पूर्ण बरा असल्याचे डॉ. अशोक अरबट यांनी सांगितले.