सदाशिव धोंडीबा कार्वे (वय ५५) असे निधन झालेल्या अग्निशमन जवानाचे नाव आहे. ते वडाळा येथील अग्निशमन केंद्रात यंत्रसंचालक होते. माटुंगा येथील सोसायटीत मॉकड्रील सुरू असताना अपघात झाला होता. त्यात कार्वे हे जखमी झाले होते. त्यांच्यावर सहा दिवसांपासून शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्वे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान, शस्त्रक्रिया करावी लागली होती, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली. दी म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनीही याबाबत माहिती दिली होती.
मुंबईतील अग्निशमन विभागाच्या मुख्यालयात शुक्रवारी सकाळी त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर सातारा येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कार्वे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे.
‘असा’ घडला विचित्र अपघात
माटुंगा येथील साई सिद्धी इमारतीत मागील शनिवारी अग्निशमन दलाकडून मॉकड्रील सुरू असताना विचित्र अपघात होऊन अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले होते. या दुर्घटनेची दखल घेत अग्निशमन दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमी जवानांपैकी दोन जवानांना सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारानंतर घरी पाठविण्यात आले होते. माटुंगा पूर्व येथील डॉ. भाऊ दाजी लाड मार्गावरील साई सिद्धी इमारतीत शनिवारी मॉकड्रील सुरू होते. त्यावेळी अचानक पाण्याचा दाब वाढल्याने दलाच्या दोन गाड्यांपैकी एक गाडी पुढे सरकली. यामुळे झालेल्या विचित्र अपघातात तीन जवान जखमी झाले होते. त्यांना तातडीने लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील चालक सदाशिव कार्वे यांच्या पायाला गंभीर जखम झाल्याने शस्त्रक्रिया करून त्यांचा एक पाय कापावा लागला होता. अन्य जखमी जवान चंचल पगारे आणि निवृत्ती इंगवले यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले होते.