ठाण्यातील ज्युपिटर येथील ब्लू स्टोन ज्वेलरीच्या दुकानात २८ जानेवारी रोजी एका तरुणानं ९७ हजार ३३० रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले. हे दागिने खरेदी केल्यानंतर आरोपीने ऑनलाइन पेमेंट केले. पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट त्यानं ज्वेलर्स चालकाला दाखवला; मात्र शंका आल्याने त्यांनी दरवाजे बंद करून घेतला आणि पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाचा डाव उघड केला. फसवणूक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, त्याने भारतातील १४ ज्वेलर्स आणि ३२ हॉटेल्समध्ये अशा प्रकारे फसवणूक करून २० ते ३० लाखांना गंडा घातला असल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सुब्रमण्यम रामकृष्ण अय्यर असं आरोपी तरुणाचं नाव असून, तो ३३ वर्षांचा आहे. हा सुब्रमण्यम उच्चशिक्षित असून, त्यानं एमबीएचं शिक्षण घेतलं आहे.
अशी होती मोडस ऑपरेंडी
आरोपी हा बेरोजगार असून मुळचा छत्तीसगड विलासपूर येथील रहिवासी आहे. त्याचा घरखर्च आईला मिळणाऱ्या पेन्शनवर चालायचा. मात्र आईचं निधन झाल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी सुब्रमण्यम हा कुठलेही काम करत नसल्याने त्याला घराबाहेर काढले होते. उदरनिर्वाह कसा चालवायचा आणि मौजमज्जा करण्यासाठी त्यानं मोबाइल अॅपचा वापर करून ऑनलाइन पेमेंटद्वारे हॉटेल आणि ज्वेलर्स व्यवसायिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या अॅपचा वापर करून क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचा. आधी निश्चित रकमेचा ट्रांझेक्शन करायचा, ते ट्रांझेक्शन फेल झाल्यानंतर पुन्हा एक रुपयाचे ट्रांझेक्शन करत होता. पेमेंट सक्सेसफुल असा मेसेज आल्यानंतर फेल झालेल्या ट्रांझेक्शनचे स्क्रीनशॉट एका अॅपच्या मदतीने एकत्र (मर्ज) करून व्यावसायिकाला दाखवून तेथून पोबारा करत होता. त्याने आतापर्यंत अहमदाबाद, बडोदा, विलासपूर, पणजी, पुणे, मुंबई, सूरत, भोपाल, इंदूर, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारे फसवणूक केली आहे. त्याने आतापर्यंत २५ ते ३० लाख रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. आरोपीविरोधात याआधी देखील मुंबई आणि हैदराबादमध्ये गुन्हे दाखल आहेत.
ज्वेलर्स आणि मोठ्या हॉटेल्समध्ये ऑनलाइन पेमेंटचं ट्रांझेक्शन झालेले मेसेज हे उशिरा येतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ऑनलाइन पेमेंटमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सध्या वाढ होत चालली आहे. त्यामुळे अशा फसवणुकीला बळी पडू नये यासाठी व्यावसायिकांनी झेलेल्या ट्रांजेक्शनचे विवरण तपासून खात्री करण्याचे आवाहन ठाणे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी केले आहे.