हातकणंगले तालुक्यातील शहापूर पोलीस ठाण्याकडून तक्रारदाराच्या आत्याच्या नावे वॉरंट निघाले होते. या कारवाईत आत्याला अटक न करण्यासाठी शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आसिफ नसृद्दीन सिराजभाई याने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयाची लाच मागितली. लाच प्रकरणात यड्रावचा पोलीस पाटील जगदीश गोपाल संकपाळ हा मध्यस्थ होता. लाचेच्या रकमेत तडजोड करत १५०० रुपये लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस कर्मचारी सिराजभाई याने दाखवली.
लाचेसंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने गुरुवारी तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर आज शुक्रवारी पोलिसांनी सापळा रचला. शहापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस कर्मचारी आसिफ सिराजभाई आणि पोलीस पाटील जगदीश संपकाळ हे दोघे दीड हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, हेड कॉन्स्टेबल शैलेश कोरे, विकास माने ,कृष्णात पाटील, रुपेश माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.