अचानक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालक दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी हडपसर वाहतूक पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
हडपसर वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांनी या गोंधळाबाबत माहिती दिली आहे. झेंडे यांनी सांगितलं की, हडपसर उड्डाणपूल जड वाहनासाठी आम्ही बंद केला होता, मात्र अचानक महापालिकेच्या पथकाने उड्डाणपूलाची पाहणी करून पूर्ण उड्डाणपूल सर्वच वाहनांसाठी बंद केला आहे. त्यामुळे चहूबाजूला कोंडी झाली आहे, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, महापालिकेने अचानक उड्डाणपूल बंद केल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप झाला असून ही कोंडी लवकरात लवकर फोडावी, अशी मागणी या वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.