दुसऱ्या लाटेत नगरची स्थिती चिंता वाढवणारी होती. त्यानंतर तिसऱ्या लाटेतही झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेली. सुदैवाने मृत्यू आणि गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी होते. प्रशासनाने रुग्णालयांसह ऑक्सिजनचीही सिद्धता ठेवली आहे. मात्र, त्याचीही यावेळी फारशी गरज पडली नाही. गेल्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्येत वाढ होत होती. मात्र, तीन चार दिवसांपासून ती झपाट्याने कमी होऊ लागली आहे. नव्या रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या दुप्पट झाल्याचं पाहायला मिळते. असं असलं तरी लसीकरणाच्या बाबतीत जिल्हा अद्याप तुलनेत मागे आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याव्यतिरिक्त इतर बंधने अद्याप शिथिल करण्यात आलेली नाहीत. बंधने शिथिल करण्यासाठी रुग्णसंख्येसोबतच लसीकरणाचे प्रमाणही लक्षात घेतलं जात असल्याने आता नागरिकरांना लसीकरणावर भर देण्याची गरज आहे.
शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर ग्रामीण भागातील शाळा गेल्या दोन दिवसांत सुरू झाल्या. शहरातील शाळा आज आणि उद्या सुरू होत आहेत. महाविद्यालये मात्र अद्याप बंदच राहणार आहेत. सध्या रूग्णसंख्या कमी होत असली तरी यापूर्वी आलेला चढउताराचा अनुभव लक्षात घेता प्रशासनही जपून पावले टाकत आहे. त्यानुसारच पुढील निर्णय घेतले जाऊ शकतात. तर दुसरीकडे नागरिकांमधूनही निष्काळजीपणा दाखवला जात आहे.
दरम्यान, बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होत असल्याने नागरिकांच्या मनात पूर्वीप्रमाणे भीती राहिलेली नाही. त्यामुळे अनेकांकडून नियम पाळण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मास्कसंबंधी मंत्रिमंडळात झालेली चर्चा, त्यावरून नेत्यांची वक्तव्य, लशीसाठी सक्ती न करण्याची सरकारने जाहीर केलेली भूमिका यांचाही विपरित परिणाम उपाययोजनांवर होत असल्याचं दिसून येते.