महावितरणच्या ‘इचलकरंजी ब’ उपविभागाच्या मेंडगुदले यांच्या वीजमीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष एमआरआयद्वारे तपासणी केली. सदर तपासणीत वीजेचा वापर सुरू असताना मीटरवरील वीजदाब व वीजप्रवाह शून्य असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी शेजारील एका ग्राहकाच्या वीजमीटरची एमआरआयद्वारे तपासणी केली असता मीटरवर वीजदाब योग्य असल्याचे आढळून आले. कोल्हापूरच्या बापट कॅम्प स्थित मीटर चाचणी प्रयोगशाळेत वीजचोरी प्रकरणातील दोन्ही वीज मीटरची पुढील तपासणी करण्यात आली. या तपासणीत मीटरचे बी फेज वा न्युट्रल वीजपुरवठा काढला असता वीज मीटर पूर्णत: बंद होत असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर सदर दोन्ही मीटर पुढील तपासणीसाठी एल ॲन्ड टी कंपनी म्हैसूर येथे नेण्यात आले. या तपासणीत वीजमीटरला उच्च दाबाने वीजपुरवठा दिल्याने आर व वाय फेजचे रेझिस्टन्स जळालेले असून मीटरमधील पीसीबी बोर्डमधून तुटून मीटरच्या आतील बाजूस पडल्याचे निदर्शनास आले.
मेंडगुदले या दोन ग्राहकांनी मीटरला बाह्य उपकरणाद्वारे उच्च दाबाचा वीज प्रवाह देवून मीटरचे रेझिस्टन्स जाळून व ठराविक रात्रीच्या वेळी मीटरच्या न्युट्रलद्वारे मीटरवर नियंत्रण मिळवून वीजमीटरवर वीजवापराची नोंद होणार नाही, या पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचं सिध्द झालं. साधारणत: दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. त्यामुळे संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार राठी यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता यांनी ही कारवाई केली.