मी पोलीस दलात रुजू झाल्यानंतर माझ्याकडे गुप्तवार्ता विभाग( CIU) आणि अन्य महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. अनिल देशमुख यांनी मला बार आणि रेस्टॉरंटसकडून वसुली करण्यास सांगितले. त्यानंतर मी डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०१२१ या काळात अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये दिले. हे सर्व पैसे अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे याच्या माध्यमातून पोहोचवण्यात आल्याचा जबाब सचिन वाझेने दिल्याचे समजते. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख पोलीस बदल्यांसाठी अनधिकृत याद्या द्यायचे: सीताराम कुंटे
काही दिवसांपूर्वीच राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबातील काही माहिती समोर आली होती. त्यामध्येही अनिल देशमुख पोलीस बदल्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे म्हटले होते. अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ईडीला सांगितले होते.