अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी येथील रहिवासी रेवणसिद्ध माळगे हे पत्नी आणि मुलीसह शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरुन कलकर्जाळ येथील सीना नदीच्या बंधाऱ्यावरून जात होते. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेल्याने मोटारसायकल बंधाऱ्यात कोसळली. यानंतर बंधाऱ्यात पडलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले.
अपघातग्रस्त दाम्पत्याची एक वर्षाची मुलगी संजीवनी बंधाऱ्यात पडून दगावली. तसंच सुप्रिया आनंद माळगे (वय २०) या महिलेचाही बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर आनंद हा स्वतः पोहत नदीकाठावार आला. घटनास्थळी सोलापूर ग्रामीण पोलीस दाखल झाले होते. मृत सुप्रिया माळगे यांचा शोध काल सायंकाळपासून सुरू होता. अखेर आज दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सीना नदीला पूर आला होता. या पुरात बंधाऱ्याचा भराव वाहून गेला होता. त्यामुळे या बंधाऱ्याची पडझड झाली होती. या पडझडीकडे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिधींनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळाल्याने ही दुर्घटना घडली असून याबाबत स्थानिक ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.