अहमदनगर :सुपर मार्केट आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला काही राजकीय आणि सामाजिक घटकांकडून विरोध होत आहे. आता ज्यांच्यासंबंधी हा निर्णय घेण्यात आला आहे, त्या किराणा दुकानदारांनीही याला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधील संगमनेर किराणा असोसिएशनने तहसीलदारांना निवेदन देऊन या निर्णयाचा निषेध केला आहे. (Ahmednagar News Update)

शिर्डी लोकसभा मतदारसंघात या निर्णयाची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. त्यानंतर आता संगमनेरच्या किराणा दुकानदारांची ही भूमिका समोर आली आहे.

पुण्यात उदयनराजेंनी घेतली अजित पवारांची भेट; राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेवरही दिलं उत्तर
संगमनेर किराणा असोसिएशनचे श्रीगोपाल रामनाथ पडताणी, पदाधिकारी जगदीश बद्दर, नितीन गुंजाळ, मुकेश कोठारी, शरद गांडोळे यांनी संगमनेरच्या तहसीलदारांना यासंबंधी निवेदन दिले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

या निवेदनात म्हटलं आहे की, राज्य सरकारचा वाईन म्हणजे दारूसंबंधी झालेला निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नीतीमतेच्या शिलाचा संहार करणारा आहे. उगवत्या पिढीला नितीमत्ता, शील व संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेने नेणारा निर्णय आहे. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज व संतांच्या पवित्र भूमीचा इतिहास व परंपरा असलेल्या महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट’ बनवू नका. या निर्णयासंबंघी आमच्या भावना तीव्र आहेत. या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही किराणा व्यापारी असोसिएशन व सर्व सदस्य या निर्णयाचा तीव्र शब्दांत धिक्कार करतो, असंही निवेदनात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here