‘सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला, पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत,’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही कायदेशीरपणेच उत्तर देऊ.
किरीट सोमय्या यांना का झाली धक्काबुक्की?
कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भातील चर्चेसाठी किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले होते. मात्र यावेळी पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. तसंच शिवसैनिकांनी प्रचंड गोंधळ घातला. झटापटीत किरीट सोमय्या चक्क पायऱ्यांवर कोसळले.