म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

करोनासाठी संरक्षित पोशाख मिळणार नसेल, तर काम करणे अशक्य आहे असा पवित्रा घेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामधील परिचारिकांनी ‘काम करतो, किट द्या’ अशा घोषणा देत संपूर्ण रुग्णालय दणाणून सोडले. सध्या या परिचारिका एचआयव्ही आजारावर वैद्यकीय उपचार देताना वापरावयाच्या हलक्या दर्जाच्या प्रतिबंधक पोशाखामध्येच वैद्यकीय उपचार करत आहेत.

ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये करोनाचा संसर्ग असलेले ३०, तर विलगीकरण कक्षामध्ये ७०हून अधिक रुग्ण दाखल असल्याची माहिती परिचारिकांनी दिली. या परिस्थितीमध्ये काम करायला तयार आहोत, पण त्यासाठी करोना प्रतिबंधासाठी लागणारे सूट तसेच इतर आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पालिकेच्या केईम, नायर तसेच जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या परिचारिकांना करोनाचा मुकाबला करण्यासाठी लागणारे प्रतिबंधात्मक पोशाख अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे संसर्ग झाला आणि सगळ्याच परिचारिका तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करावे लागले, तर रुग्णसेवाच कोलमडण्याची भीती या परिचारिकांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात पालिका रुग्णालयांमधील कोविड कक्ष खुले करण्यात आले. पूर्वी सर्वसाधारण रुग्णांसाठी वापरण्यात येत असलेल्या कक्षांचेच रूपांतर कोविड कक्षामध्ये करण्यात आले आहे. कोविडची चाचणी न झालेले काही रुग्ण येथे येतात. सर्व चाचण्या कस्तुरबामधून होत असल्याने आलेल्या रुग्णाला कोविडचा संसर्ग आहे का, याची माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

समान दर्जाचे किट द्या

रुग्णालयामध्ये डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी यांना देण्यात आलेल्या वैयक्तिक सुरक्षा किटचा (पीपीई) दर्जा वेगवेगळा आहे. रुग्णाशी थेट संपर्क, नाइट ड्युटी यांमुळे परिचारिकांना या किटची अधिक गरज असते. सर्वच कर्मचाऱ्यांना समान दर्जाचे देण्याची मागणी करण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे एकदा किट घातले की, ते आठ तास काढता येत नाही. त्यामुळे अनेकजणी लघुशंका रोखून धरतात. मासिक पाळीमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचा त्रासही सांगता येत नाही. गरोदर परिचारिकांना यातून वगळण्याची मागणीही करण्यात येत आहे. उपलब्ध किटमध्येही काहींमध्ये मास्क नाही, काहींमध्ये ग्लोव्ह्ज नाही, अशी अवस्था आहे. एचआयव्ही उपचारांसाठी वापरात येणारे किटचा दर्जा हा फारसा चांगला नसून त्यातील ग्लोव्ह व टोप्या घालताना फाटतात, अशीही तक्रार परिचारिकांनी केली आहे.

जेवण देतानाही दुजाभाव

नायर आणि केईएम रुग्णालयामध्ये करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या परिचारिकांची व्यवस्था ज्या विलगीकरण कक्षामध्ये करण्यात आली आहे, तिथे बाथरूम, जेवणाचीही सुविधा व्यवस्थित उपलब्ध नाही. रुग्णालयांमध्ये सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आहारवाटप करण्यात येते, तोदेखील अनेकदा मिळत नाही, त्यातही दुजाभाव करण्यात येतो, अशीही तक्रार पालिका रुग्णालयातील परिचारिकांनी केली आहे. या संदर्भात आलेल्या पत्राची दखल घेत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी असा प्रकार पुन्हा घडणार नाही, वैद्यकीय कर्मचारी तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आरोग्याची काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here