म. टा. प्रतिनिधी, नगर

‘करोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्यामुळे टीव्ही, मोबाइल, संगणक, लॅपटॉप, टॅब यांचा वापर वाढू लागला आहे; मात्र, सतत स्क्रीनसमोर असल्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेच ‘स्क्रीन टाइम’च्या या वाढत्या काळात आपल्या डोळ्यांची काळजी घेणेही गरजेचे आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात टीव्ही पाहणे, मोबाइल, संगणक, लॅपटॉप, टॅब यावर चित्रपट पाहणे, गेम खेळणे याचे प्रमाणही वाढले आहे. याचाच अर्थ लॉकडाउनच्या काळात नागरिकांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढू लागला असून त्याचा मात्र विपरित परिणाम डोळ्यांवर होण्याचा धोका आहे. मुळात डोळे हा फार नाजूक अवयव आहे. वाढत्या वयात तर ते अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे आधीच योग्य काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. या काळात तर डोळ्यांची अधिकच काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे मत आहे.

वर्तमानपत्रे, पुस्तके वाचावित

‘सतत टीव्ही, मोबाइल पाहणे हे डोळ्यांसाठी चांगले नाही. ‘स्क्रीन टाइम’ हा दिवसभरात शक्यतो तीन तासांच्या वर नसावा,’ असे नेत्रतज्ज्ञ डॉ. रोहित थोरात यांनी सांगितले. ‘स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवण्यापेक्षा वर्तमानपत्रे, पुस्तके वाचण्यास काही वेळ द्यावा. घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांसोबत कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी आदी खेळ खेळावेत. मुलांना या खेळांची माहिती करून द्यावी. मुलांना नवनवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते,’ असे त्यांनी सांगितले.

जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवल्यास डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. डोळ्याला त्रास होतो, थकवा येतो. दिवसभरात दोन ते तीन तासांपर्यंत स्क्रीन टाइम असावा. सतत स्क्रीनसमोर राहणे धोकादायक आहे. जास्त वेळ स्क्रीनसमोर देण्यापेक्षा वर्तमानपत्रे, पुस्तकांचे वाचन करण्यास वेळ द्यावा.
– डॉ. रावसाहेब बोरुडे, नेत्रतज्ज्ञ

अशी घ्या काळजी :

– भरपूर पाणी पिणे.

– संगणकावर एका तासाच्या कामानंतर डोळ्यांना किमान पाच मिनिटे विराम द्यावा.

– पापण्या लवण्याचे प्रमाण वाढवा.

– हिरव्या पालेभाज्या, फळे यांचे सेवन जास्त करणे.

– थंड बर्फाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवणे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here