जवळपास तीन दशकांपूर्वी राजस्थानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी गरीबांच्या मदतीसाठी जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी लतादीदी या जयपूरला आल्या होत्या. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जवळपास ४० हजार प्रेक्षक आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांनी तिकीट काढून सवाई मानसिंह मैदानात प्रेक्षकांमध्ये बसून लतादीदींचे गाणे ऐकले होते. भीषण दुष्काळात पीडितांच्या मदतीसाठी लता मंगेशकर यांनी १ कोटी १ लाख रुपयांचा धनादेश हरिदेव जोशी यांच्याकडे सुपूर्द केला होता.
जयपूरमध्ये आज वाहणार लतादीदींना श्रद्धांजली
लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकाकूल आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजानं प्रत्येक देशवासियाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांची हजारो गाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.