लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. एका रिपोर्टनुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती जवळपास ५ कोटी अमेरिकी डॉलर म्हणजेच अंदाजे ३७० कोटी रुपये आहे. लतादीदींकडे कारचे कलेक्शन उत्तम होते. त्यांनी खूप वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना कारची खूपच आवड होती. रिपोर्ट्सनुसार, लतादीदी यांनी पहिली कार आपल्या आईच्या नावाने खरेदी केली होती. त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या अलीशान कार होत्या. इतकेच नाही तर, यश चोप्रा यांनी त्यांना एका गाण्याच्या प्रदर्शनावेळी भेट म्हणून मर्सिडिज कार दिली होती. याबाबत त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते. यश चोप्रा हे लतादीदींना बहीण मानत होते.
करोना महामारीत केली होती २५ लाखांची मदत
लता मंगेशकर यांनी करोना काळात मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. लतादीदी या दक्षिण मुंबईतील पेडर रोडस्थित प्रभू कुंज इमारतीत राहत होत्या. जानेवारीत त्यांना करोना संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाचं निदान झालं होतं. प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. मात्र, ५ फेब्रुवारीला त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज, रविवारी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.