Lata Mangeshkar passes away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. तसेच लतादीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. अशीच एक त्यांची आठवण ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख यांनी सांगितली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी या गावातील ही लतादीदींची आठवण देशमुख यांनी सांगितली आहे. यामधून लता मंगेशकर यांच्या संवेदनशिलतेचा प्रत्यय आला आहे. 

औराद शहाजानी या गावातील काही मंडळींनी 1970 मध्ये एका महाविद्यालयाची स्थापना करण्याचे ठरवले होते. स्थापन करण्यात येणाऱ्या महाविद्यालयाला राजकीय किंवा सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीचे नाव न देता, एखाद्या संगीत किंवा सांस्कृतीक क्षेत्रातील व्यक्तीचे नाव देण्याचे ठरवण्यात आले. या महाविद्यालयाला गायक, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे नाव देण्याचे गावातील मंडळींनी ठरवले. त्यानंतर औराद शहाजानी गावातील प्रमुख मंडळी लता मंगेशकर यांना भेटण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा याठिकाणी गेले. या सर्वांनी लतादीदींना आपल्या वडीलांचे दीनानाथ मंगेशकर यांचे नाव महाविद्यालयाला देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. वडिलांच्या नावाने महाविद्यालय स्थापन होत आहे म्हटल्यावर मंगेशकर कुटुंबियांना खूप आनंद झाला.

दरम्यान, 1970 मध्ये महाविद्यालयाचा पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मायी मंगेशकर आणि ग. दि. माडगूळकर हे दोन मान्यवर उपस्थित होते.  त्यानंतर 1976 मध्ये महाविद्यालयाच्या वास्तूच्या उद्धाटनाचा मोठा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला  त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, लता मंगेशकर, आमदार शिवराज पाटील चाकूरकर उपस्थित होते. यावेळी लतादीदींना असे सांगण्यात आले की, अद्याप महाविद्यालयाची इमारत अपूर्ण आहे. त्यासाठी निधी कमी पडत आहे. त्यानंतर लता मंगेशकर यांनी औराद शहाजानी या गावात ‘लता मंगेशकर संगीत रजनीचा’ कार्यक्रम करण्याचे ठरवले. त्यानंतर फेब्रुवारी 1981 लता मंगेशकर आणि त्यांच्या भावंडांनी एक उत्तम कार्यक्रम औराद शहाजानी या गावात केला. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. तो कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला. त्या कार्यक्रमात मिळालेला निधी त्यांनी महाविद्यालयच्य इमारतीसाठी दिला. त्या कार्यक्रमाच्या आठवणी आजही लोकांच्या मनात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here