गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज, रविवारी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानं संगीत, सामाजिक, राजकीय क्षेत्रासह संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. लतादीदींच्या सन्मानार्थ दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने दिली. दुसरीकडे राज्य सरकारनेही दुखवटा घोषित केला आहे. राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. संगीत आणि कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
लता दीदींना 2001 मध्ये भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं तो क्षण
लतादीदी अजरामर राहतील: मुख्यमंत्री
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. ‘आपल्या लाडक्या लतादीदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग, क्षण लतादीदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी, स्फूर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल, जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.