नवी दिल्ली : मराठी भाषक लता मंगेशकर यांनी उर्दूतील आपले उच्चार परिपूर्ण कसे केले? या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास १९४७मध्ये जावे लागेल. ज्यावेळी लतादीदी दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेटल्या, तेव्हा त्यांनी मराठी भाषकांच्या उर्दू उच्चाराबाबत शंका उपस्थित केली व त्यांना मौलानांकडून उर्दूचे धडे घेण्याचा सल्ला दिला.
लोकल ट्रेनमध्ये प्रसिद्ध संगीतकार अनिल विस्वास यांनी १९४७मध्ये दिलीप कुमार यांच्याशी माझी ओळख करून दिली. ‘ही लता आहे. चांगले गाते’, असे विश्वास यांनी त्यांना सांगितले. त्यावर दिलीप कुमार म्हणाले, ‘बरं कुठल्या आहेत त्या? यावर विश्वास यांनी माझे पूर्ण नाव सांगितले, लता मंगेशकर… मी महाराष्ट्रीयन आहे हे कळल्यावर युसूफभाईंनी केलेल्या टिप्पणीमुळे माझ्या हिंदी आणि उर्दू भाषेबाबतच्या उणीवा दूर झाल्या. ‘ज्या गायकांना उर्दूची जाण नव्हती, ते या भाषेतील शब्दांच्या उच्चारात नेहमीच फसले आहेत. परिणामी सुरांइतकाच गीताचा आनंद लुटू पाहणाऱ्यांचा हिरमोड होत आला आहे’, असे ते त्यावेळी म्हणाले होते, असे लतादीदींनी पुस्तकात म्हटले आहे.