‘बंदिस्त सभागृहांमध्ये क्षमतेच्या कमाल ५० टक्के आणि जाहीर प्रचारसभांना क्षमतेच्या कमाल ३० टक्के उपस्थिती किंवा सुरक्षित वावराच्या नियमांच्या आवश्यकतेनुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या नियमांचे पालन केले जाईल, या अटीवरच जाहीर प्रचारसभा, बंदिस्त सभागृहांतील सभा आणि रॅली यावरील निर्बंध शिथिल केले जातील,’ असे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) बंदिस्त सभागृहात किंवा खुल्या मैदानात प्रचारसभेला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येची कमाल मर्यादा किंवा क्षमतेची टक्केवारी निश्चित केली असेल, तर तिचे कठोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. जाहीर सभेच्या ठिकाणी अनेक प्रवेशमार्ग असावेत, जेणेकरून सभेला येताना आणि जाताना गर्दी होणार नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
स्टार प्रचारकांना सुरक्षा
निवडणूक काळात त्या-त्या राज्यातील राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांना पुरेसे सुरक्षा कवच देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये प्रचारासाठी गेलेले एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आयोगाने हे निर्देश दिले आहेत. ५ फेब्रुवारी रोजीच्या आयोगाच्या पत्रानुसार राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही हे निर्देश लागू आहेत.