मिळखतखार मळा हे ४० घरांचे आणि दीडशे लोकसंख्या असलेले गाव आहे. ४० वर्षे गावातील ग्रामस्थांना शेताच्या बांधावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अनेक समस्यांना ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. माध्यमांमध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र तरीही एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याने किंवा लोकप्रतिनिधींनी या गावाला भेट देऊन त्यांची मागणी पूर्ण करण्याबाबत पुढाकार घेतलेला नाही. ग्रामस्थांनी अलिबाग प्रांताधिकारी याच्याकडे रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यानुसार प्रांतांनी अलिबाग पंचायत समितीला भूसंपादन विभागाकडे प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पंचायत समिती विभागामार्फत लवकरात लवकर पावले उचलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
रस्त्यासाठी आता मळा ग्रामस्थांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी येणारा लोकप्रतिनिधी रस्त्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन गेल्या ४० वर्षांपासून देत आहे. मात्र निवडणूक झाल्यानंतर मळा गावाकडे फिरकतही नाही. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मळा ग्रामस्थांनी कोणालाच मत न देण्याचा निर्णय घेतला आहे. आपले बहुमूल्य मत हे कोणा उमेदवाराला न देता, नोटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता नाही तर मत नाही असे बॅनर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लावून आपला निषेध व्यक्त केला आहे.