नागपूर: करोनाची लागण होऊ नये यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे दारुड्यांचे हाल होत आहेत. दारुड्यांनी आता चक्क बीअर बार फोडायला सुरुवात केली आहे. नंदनवनमधील खबरी येथील आनंद बीअर बार व सावनेरमधील गोविंद बीअरबार फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मद्यसाठा लंपास केला. बुधवारी सकाळी या दोन्ही घटना उघडकीस आल्या.
उपराजधानीत जमावबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, बाअर बार बंद आहेत. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी आनंद बार अॅण्ड रेस्टॉरेंटच्या दरवाजाचे कुलूप तोडले. बारमधील दारुच्या बाटल्या चोरी केल्या. याचप्रमाणे सावनेर येथील गोविंद शेटे याच्या मालकीच्या गोविंद बारचे शटर वाकवून चोरटे आत घुसले. बारमधील ४० हजार रुपयांचा मद्यसाठा चोरी केला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी चोरट्याने एमआयडीसीतील देशी दारूचे दुकान फोडून दारूच्या ३३ पेट्या लंपास केल्या होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times