एरंडोल तालुक्यातील वैजनाथ येथे नितीन शालीग्राम पाटील हा तरुण कुटुंबियांसोबत वासव्यास होता. त्याचा मोठा भाऊ पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला असून नितीन हा घरी वडिलांना शेतीकामात मदत करत होता. शेतात रात्रीची लाईट असल्याने नितीन हा रविवारी रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळच्या सुमारास नितीनचे काका भगवान पाटील हे शेतात गेले असता नितीनने झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती भावाला म्हणजेच मृत नितीनच्या वडिलांना दिली.
घटनास्थळी धाव घेत वडिलांनी नितीनचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. याठिकाणी त्याची तपासणी केली असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सकाळी घरी परतलाच नाही…
नितीन नेहमीप्रमाणे शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जात असल्याने तो रात्रभर शेतातच थांबत होता आणि सकाळी घरी येत होता. परंतु आज त्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. नितीनच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.