Aurangabad News 15 Lakh Deposited In Farmer Jandhan Account But | शेतकऱ्याच्या जनधन खात्यात आले १५ लाख; स्वप्नातलं घर बांधलं अन् समोर आली धक्कादायक माहिती
औरंगाबाद: पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील एका शेतकऱ्याचा खात्यात तब्बल १५ लाख जमा झाले. त्याला वाटले पंतप्रधान मोदींनी २०१४ च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत हे पैसे त्याच्या जनधन खात्यात टाकले. यातील ९ लाख काढत त्याने त्याचे घरही बांधले. मोदींनी १५ लाख दिल्याची गावभरात चर्चा ही झाली, पण सहा महिन्यानंतर काही वेगळंच घडलं.
झालं असे की, पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या, बँक ऑफ बडौदाच्या खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ ला १५ लाख ३४ हजार ६२४ रुपए जमा झाले. त्यामुळे मोदींने आपलं आश्वासन पूर्ण करत आपल्याला पैसे पाठवले, असं औटे यांना वाटलं. त्यानंतर खात्यात इतके पैसे कसे आले यावर गावात चर्चा सुरु झाली, तर मोदींनी पाठवलेल्या पैश्याबद्दल अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन केलं. तर औटे यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेल करत आभार मानले. कौतुकास्पद! औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी एकाच गावातील तीन बालविवाह रोखले इकडे औटे आनंदीआनंद असताना,दुसरीकडे पिंपळवाडी ग्रामपंचायतला १५ व्या वित्त आयोगाचे जिल्हा परिषदेकडून मिळणारे पैसे खात्यावर आलेच नसल्याने चौकशी सुरू झाली. आणि हे पैसे औटे यांच्या खात्यावर जमा झाल्याची चूक ४ महिन्यांनंतर ग्रामपंचायतीला लक्षात आली. आता ज्ञानेश्वर यांना ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी पत्र पाठवले.
आता पैसे कुठून देणार….
खात्यात १५ लाख ३४ हजार ६२४ रुपये जमा झाल्याचं शेतकऱ्याच्या लक्षात आल्यावर, ते पैसे मोदींनी पाठवलं असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यातील ९ लाख रुपये काढून शेतकऱ्याने घर बांधले. आता त्याच्याकडे ग्रामपंचायत पैसे परत करण्यासाठी दबाव आणत आहे. तर खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला मिळाल्याचे वाटल्यानेच आपण ते खर्च केले, आता उरलेले ६ लाख व खर्च केलेली रक्कम आपण बँकेला व ग्रामपंचायतीला हप्त्या-हप्त्याने परत करू असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.