चिपळूणजवळ दरड कोसळली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात ही दुर्घटना घडली. दरडीच्या ढिगाऱ्याखाली जेसीबी अडकला आहे. तर दोन कामगार दबल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरड खाली कोसळताना एका कामगारानं जीव वाचवण्यासाठी पळ काढला. त्यामुळे तो बचावला. दोन कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मिळत आहे. दरडीचा आणखी काही भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे, त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये चौपदरीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काम करत असताना डोंगराचा काही भाग खोदण्यात आला आहे. त्या डोंगराचा काही भाग कोसळला. या ठिकाणी जेसीबीने काम केले जात होते. दरडीचा काही भाग थेट जेसीबीवर पडला. जेसीबी ढिगाऱ्याखाली गाडला गेला. हा परिसर दरडींमुळे धोकादायक झाला आहे. चार दिवसांपूर्वी एक दगड कोसळून थेट एका घरात घुसल्याची घटना घडली होती. आता थेट दरडच कोसळली. दरम्यान डोंगराचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक दोन्ही बाजूने थांबवण्यात आली आहे. दोन ते अडीच तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे घाटामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते-चेरणी मार्गे लोटे, अशी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times