पुणे: तबलिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील २८जणांपैकी २६ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर दोन जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांचा आकडा चारवर पोहोचला आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडमधील २३ नागरिक आणि त्यांचे पाच नातेवाईक अशा २८ जणांचे घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी २६ नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. मात्र, दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने या दोघांनाही क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तसेच या दोघांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, पुण्यातील ४६ नागरिकांनीही तबलिगी जमातच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. या सर्वांना तात्काळ शोधून नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या ४६ पैकी ४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर इतर चौघांचे अहवाल अद्याप यायचे बाकी आहेत, अशी माहिती पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली. दरम्यान, जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या ४६जणांपैकी ४२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here