मोदींनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्र सरकारने खुलासा केला पाहिजे होता. पंतप्रधानांचं वक्तव्य एकून मला वाईट वाटलं. महामारीचा उगम चीनमधून झालाय. त्याचं महाराष्ट्र खापर फोडणं योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नची वाहवा केली. महाराष्ट्रामुळे महामारी आली म्हणजे हा सरकार, डॉक्टर, नर्स यांचा अपमान आहे. आता महाविकासआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पुढं येऊन बोलायला हवं. मी एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी फटकारल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडबडून जाग आली. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींच्या टीकेचा प्रतिवाद सुरु करायला सुरुवात केली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही आम्ही पत्रकारपरिषद घेऊन या सगळ्यावर बोलणार असल्याचे म्हटले.
सुप्रिया सुळेंचं अचूक टायमिंग
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्याची पिसं काढली. देशात करोनाची पहिली लाट असताना केंद्र सरकारच श्रमिक ट्रेन सुरु केल्याचा डंका पिटत होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रावर ज्याप्रकारचे आरोप करत आहेत, ते पाहून मला दु:ख झाल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांच्या या भाषणाचे अचूक टायमिंगही लक्षात घेण्याजोगे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावाच्या चर्चेत सहभागी झाले. त्याच्या काही मिनिटे आधीच सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषद घेऊन करोना काळातील केंद्र सरकारच्या निर्णयांकडे लक्ष वेधले. जेणेकरून नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतील भाषणानंतर कालच्याप्रमाणे प्रसारमाध्यमांमध्ये महाराष्ट्र सरकारविरोधात एकांगी चर्चा रंगणार नाही, याची काळजी सुप्रिया सुळे यांनी घेतल्याची चर्चा आहे.